+91 9422934434

आ.डॉ.तानाजी सावंत यांचा मंत्रीपदाचा पत्ता कट करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात?

By राजकीय कट्टा टीम December 30, 2019

 

उस्मानाबाद दि.३० आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला.त्यात अनेक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. काहींना अपेक्षित तर काहींना अनपेक्षितपणे मंत्रीपदाची लॉटरी लागली मात्र यामध्ये शिवसेनेकडून आमदार डॉ.तानाजी सावंत यांचे मंत्रिपद नक्‍की मानलं जात होतं मात्र त्यांना ऐनवेळी शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे.

     डॉ.तानाजी सावंत यांचा राजकीय इतिहास हा फार मोठा किंवा खूप दिवसापासूनचा नाही तर 2016 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला केला आणि लगेच यवतमाळ-वाशिम विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मधून त्यांना तिकीट देण्यात आले आणि त्यात त्यांनी मोठा विजय मिळवला त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख वाढतच गेला 2016 पहिल्यांदा उपनेतेपद, 2016 ला विधान परिषद सदस्य,त्यानंतर 2017 ला सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पद, आणि त्यानंतर 2019 ला त्यांनी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करत खा.ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेकडून लोकसभेचे तिकीट मिळवून दिलं. राज्यात एकूण शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी केवळ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यामुळे आ.डॉ.तानाजी सावंत यांची शिवसेनेत खूप मोठी चलती आहे असाच संदेश सर्वत्र गेला आणि विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्या एकाधिकारशाही मुळे अनेक शिवसेनेच्या हक्काच्या जागा देखील गमवाव्या लागल्या.आमदार सावंत यांनी नवनवीन नेते तयार केले तसेच त्यांनी अनेक लोकांना अंगावर देखील घेतले होते.

त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही न ऐकावी अशी टीका त्यांनी सोलापूर व परंडा येथील सभेमध्ये केली.आजही त्या सभेच्या क्लीप व व्हिडीओ व्हायरल होत आहेत या दोन सभांमधून तर एका पत्रकार परिषदेमधून खा.शरद पवार यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरती त्यांनी टीका केली आणि या टीकेमुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागल्याची चर्चा सध्या माध्यमात आहे.खा.शरद पवार यांना राजकारणात कोणी अंगावरती घेत नाही मात्र ते धाडस आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी केलं आणि त्या धाडसामूळे त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं असं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे.

   उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांना डॉ.तानाजी सावंत यांचा मंत्रीपदाचा कटलेला पत्ता हा जिव्हारी लागलेला आहे तर तर शिवसेनेतील त्यांच्याकडून दुखावलेल्या अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फूटताना दिसून येत आहेत.आमदार डॉ.तानाजी सावंत हे आता भविष्यात कशा पद्धतीने राजकारण करणार नवीन काही पर्याय शोधणार याविषयी सध्या तर्कवितर्क सुरू आहे.

Share This