+91 9422934434

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांची मतदारसंघाकडे पाठ

By राजकीय कट्टा टीम January 11, 2020

भूम दि.११-भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून 24 ऑक्टोबर 2019 रोजी निवडून आल्यानंतर आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आलंय. पालकमंत्री असताना त्यांनी या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला होता मात्र आमदार होऊनही त्यांनी मतदारसंघात कुठेही त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला ना कोणता पक्षाचा कार्यक्रम झाला.त्यामुळे लोकांनी मोठ्या मताधिक्‍याने निवडून देऊन सुद्धा ते नेमकं मतदारसंघात का फिरकत नाहीत असा प्रश्न निवडून दिलेल्या लोकांना पडला आहे.

 

   आमदार डॉ.तानाजी सावंत हे यवतमाळ-वाशिम विधानपरिषद सदस्य असताना देखील त्या ठिकाणी असणारे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य यांची देखील तीच तक्रार होती व आता भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात त्यांना मोठ्या मताधिक्क्याने जनतेने निवडून दिले आहे तरीही त्यांनी मतदारसंघात निवडून आल्यापासून केवळ एक वेळा उस्मानाबाद जिल्ह्यात संकटाची परिस्थिती असल्यामुळे काळजीवाहू पालकमंत्री म्हणून दौरा केला होता.त्यानंतर मात्र मतदारसंघात त्यांनी आपला चेहरा दाखवलेला नाही त्यामुळे आपण निवडून दिलेले आमदार चुकीचे तर नाहीत ना?अशी चर्चा सध्या गावागावात सुरू आहे या पूर्वीचे आमदार जनतेच्या संपर्कात राहत होते त्याचबरोबर लोकांच्या सुखदुःखात ते मिसळत होते मात्र नवीन आमदारांनी मतदार यादीत नोंदवलेल्या मुगाव गावातील जवानाचा सीमेवर लढत असताना मृत्यू झाला त्यावेळी देखील त्या जवानाच्या घरी साधी भेट देखील दिलेली नाही.

      नुकताच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात आमदार डॉ.तानाजी सावंत यांचा समावेश होईल अशी अपेक्षा मतदारसंघातील मतदार,शिवसेनेचे कार्यकर्ते ते व खुद्द आमदार डॉ.तानाजी सावंत यांना होती मात्र शिवसेना पक्षाने त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसवल्यामुळे ते कमालीचे दुखावले असल्याची चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे. त्यातच परवाच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीमध्ये हे त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यामुळे नेमके आ.डॉ.तानाजी सावंत कोणाचे असा प्रश्न सध्या चर्चिला जातोय.

       आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षात ज्या पद्धतीने आपला जम बसवला ते पाहता ते शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जात होते मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यापासून ते शिवसेनेत राहणार की अन्य काही पर्याय निवडणार याविषयी देखील शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहे.भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ते कोणत्या पक्षात आहेत याच्याशी देणेघेणे नसून ते आपले आमदार आहेत व त्यांनी लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे व मतदारसंघातील ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकातून व्यक्त केली जातेय.

Share This