+91 9422934434

ग्राम विकासातील युवकांचे कार्य महत्त्वपूर्ण- अहिल्या गाठाळ

By राजकीय कट्टा टीम December 19, 2019

 

कळंब-दि.१७-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचालित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिर - राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी युवक" या शिबिराचे आयोजन मौजे करंजकल्ला येथे करण्यात आले. या शिबिरात समारोप समारंभात कळंबच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अहिल्या गाठाळ  यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य, ग्राम विकासातील युवकांचे योगदान आणि आजच्या तरुणांकडून ग्रामीण विकासातील होणारे कार्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले. आजच्या तरुणांनी ग्राम विकासाकडे सक्रियपणे सहकार्य करणे, शालेय सुधारणा, सामाजिक परिवर्तन, व्यसनमुक्ती, महिलांचे आरोग्य, महिलांचे शिक्षण, लहान मुलांना शालेय परिसरात खेळण्यासाठी असणाऱ्या साहित्याची देखील या ठिकाणी चर्चा केली. खरेतर ग्राम समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांनी ग्रामीण विकासासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. करंजकल्ला येथे 40 फुट रुंद व 5 फूट उंचीचा माती बंधारा बांधून पाणी अडवण्यासाठी फार मोठे योगदान राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांनी व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी करंजकल्ला येथे केले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. खरेतर ग्रामीण विकासासाठी आज सर्व स्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे, एका बाजूला दुष्काळाशी सामना करणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणापासून वंचित असणारा घटक देखील ग्रामीण समुदायात दिसून येतो, म्हणून या सर्व परिस्थितीत आजच्या तरुणांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी देखील चांगले शिक्षण घेऊन चांगले अधिकारी म्हणून ग्रामीण समाजाकडे विकासाचे दृष्टिकोन घेऊन आले तर समाज परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे सखोल मार्गदर्शन अहिल्या गाठाळ  यांनी याप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकूल तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.अशोकराव मोहेकर ,प्राचार्य डॉ. सुनिल पवार, करंजकल्याचे सरपंच विशाल पवार,उपसरपंच विलास पवार,धनंजय पवार,सुजित पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल यांनी देखील जल है तो कल है असे म्हणून विद्यार्थ्यांना जलसंवर्धन ही काळाची कशी गरज आहे आहे याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. अशोकराव मोहेकर यांनी युवक आणि समाज यांचे अतूट नाते आहे तसेच आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि करंजकल्ला गाव यांचे देखील कौटुंबिक नाते आहे व ते विकासाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही अबाधित राखण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहोत. करंजकल्ला गावाच्या विकासाकरिता आमचे महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग नियमितपणे प्रयत्न करीत राहणार आहे.

याप्रसंगी श्री. विशाल पवार यांनी या शिबिरामध्ये शिबिर समन्वयक व सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. सात दिवसीय शिबिरात स्वयंसेवकांच्या माध्यमातून आमच्या गावांमध्ये ग्रामस्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, शालेय परिसरातील स्वच्छता, पशु लसीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला मेळावा, माती बंधारा, शालेय साहित्याचे वाटप, रॅलीचे आयोजन, समाज प्रबोधनात्मक कार्य व व्याख्याने घेऊन आमच्या गावांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. त्याकरिता मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व असेच कार्य आमच्या करंजकल्ला गावामध्ये नियमितपणे होत राहावे यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. असे भावनिक विचार याप्रसंगी व्यक्त केले.

या समारोप समारंभाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिबिर समन्वयक प्रा. ईश्वर राठोड, डॉ. संदीप महाजन, डॉ. मीनाक्षी जाधव, प्रा. अर्चना मुखेडकर, श्री. अरविंद शिंदे यांनी परिश्रम घेऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईश्वर राठोड रासेयो कार्यक्रमधिकारी यांनी केले, तर आभार डॉ. मीनाक्षी जाधव यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share This